पंढरपूर : पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित 'पंचम संगीत विद्यालय'आयोजित इयत्ता पाचवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व अभिजात संगीताची परंपरा चालू राहावी यासाठी शास्त्रीय गायन व तबला वादन स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेचे उद्घाटन पंढरपूर अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन शास्त्रीय संगीत उपासक सौ. माधुरीताई जोशी यांचे शुभहस्ते वाद्यांचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्री पटवर्धन यांनी आपल्या भाषणात विद्यार्थी हा सर्वांगिण व कलाउपासक असावा अशी अपेक्षा व्यक्त करून आमचा मानस असा आहे की तो फक्त अभ्यासातच चमकण्यापेक्षा त्याच्या अंगी असलेल्या इतर कलागुणांचाही विकास व्हावा व तो उद्याचा एक सक्षम आणि संवेदनशील नागरिक बनवा. या एकाच उद्देशाने आम्ही या पंचम संगीत विद्यालयाची स्थापना केली आहे. या माध्यमातून असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवणार आहोत. संगीताची साधना करणारे साधक कलाकार यातून निर्माण व्हावेत.या प्रसंगी त्यांनी सर्व स्पर्धक कलाकारांना शुभेच्छा दिल्या.सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.स्पर्धेचे यंदाचे पहिले वर्ष आहे.
राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेत लातूरच्या कु. ईश्वरी आमोद जोशी हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक विनीत विजय शिंदे पंढरपूर व तृतीय क्रमांक कु. वेदांगी विनोद भरते पंढरपूर हिने प्राप्त केला.
तबला वादनस्पर्धेत लातूरचा चि.समीहन हरिसर्वोत्तम जोशी हा प्रथम क्रमांक तर चि. कृष्णा जितेंद्र भोसले मिरज व चि. वेदांत मधुकर आडसकर हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दोन हजारांचे रोख पारितोषिके व प्रमाणपत्र संस्थेचे मानद सचिव श्री. सुधीर पटवर्धन सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातून जवळपास 42 स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी संस्थेचे सदस्य श्री. शांताराम कुलकर्णी, श्री. संजय कुलकर्णी, कवठेकर प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री सुनील रूपनर व पर्यवेक्षिका सौ. एस. आर. कुलकर्णी, उपस्थित होते.
तबला वादन स्पर्धेचे परीक्षण श्री. महेशराज साळुंके पुणे व श्री. राम चौगुले जयसिंगपूर यांनी केले तर शास्त्रीय गायन स्पर्धेचे परीक्षण डॉ. प्रसाद कुलकर्णी व सौ. आसावरी पटवर्धन यांनी केले.
परीक्षक सौं पटवर्धन मॅडम यांनीही आपले मनोगतात म्हणाल्या की, अशा स्पर्धा हे एक माध्यम असते. यांतूनच आपल्यातील कलागुणांची वाढ होत असते. आपल्या गुरूंची ओळख ही आपल्या कलेतूनच आपण जगाला दिली पाहिजे. यावेळी सर्व यशस्वी कलाकारांचे त्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी परीक्षकांचा सन्मान श्री. सुधीर पटवर्धन सर यांचे हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक पंचम विद्यालयाचे प्रमुख श्री. विनोद शेंडगे यांनी केले. मान्यवरांचा सन्मान पंचम संगीत विद्यालयाचे प्रशिक्षक श्री. उमेश केसकर सर यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचम संगीत विद्यालयाचे प्रशिक्षक श्री. राजेश खिस्ते सर यांनी केले. तर सौ. एस. आर. कुलकर्णी यांनी आभार मानले.
Comments